Wednesday, July 30, 2014

Found a Flute teacherज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया ।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥
या गुरु वंदनेत रचनाकार म्हणतात की अज्ञानाने बंद असलेले डोळे ज्यांनी ज्ञानरुपी काजळ लावून उघडले त्या गुरुला मी वंदन करतो.

प्रत्येक
माणसाच्या आयुष्यात गुरुचे स्थान अतिशय महत्वाचे असते. गुरु ही नशिबात असेल तरच प्राप्त होणारी एक विभुती आहे जी एकदा लावली की मग इतर कोणत्याच गोष्टीची गरज पडत नाही.
माझं नशिब त्या बाबतीत अतिशय उत्तम आहे असं म्हणावं लागेल. मला जे गुरु लाभले त्यांचं मी शब्दात कितीही वर्णन केलं तरी ते तोकडं पडेल याची मला खात्री आहे. शब्द फार मर्यादित स्वरुपात आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतात,
तरीसुद्धा माझ्या नशिबाने मिळालेल्या या विभुतीबद्दल थोडे लिहिण्याची चेष्टा करत आहे,
साधारण वर्षांपुर्वीची गोष्ट असेल ,मला चंदनचा फोन आला,आणि मी काहीसे आढेवेढे घेतच तो उचलला.
"
अजिंक्य,मी खूप वाट पाहिली आणि मी बासरी शिकायला सुरवात केली आहे."
फारसं लक्ष द्यायची गरज नव्हती,तो नेहमीच अशी धमकी द्यायचा आणि मी ती ऍकून,"ठीक आहे चंदन, बघुया किती दिवस टिकत्ये शिकवणी अशा थाटात ती ऍकून घ्यायचो.यावेळेस तर मी कर्नाटकात दांडेली मधे भावंडांसोबत मस्त धमाल करत होतो, त्यामूळे खिशात हजाराची नोट असताना दहाच्या नोटेकडे आपण जसं पहातो तसचं मी त्या फोन कडे लक्ष दिलं आणि परत भावंडांकडे सामील झालो. नंतर आठवड्याने पुण्याला परतलो आणि अर्थातच तो विषय विसरलो.
सोमवारी सकाळी परत साहेबांचा फोन,"मी आत्ता गुरुजींकडे निघालोय, चहा घ्यायला नेहमीच्या ठिकाणी भेटू."
मला वेळ होता, ठरल्या वेळेत तिथे गेलो.चहा घेता घेता तो म्हणाला," अरे तु फक्त चल, नाही दिवसभर बसून राहिलास तर बघच."
त्याचा सूर आश्वासक वाटला.मी विचारलं नाव काय आहे?
"
अमोल देवगावकर." चंदन
मग आमचे मार्गदर्शक जिथे नेतील तिथे जायला लागलो.नारायण पेठेतल्या गोवईकर वाड्यामधे त्याने मला थांबवल.बाहेरच 'गुळवणी महाराज येथे राहात होते' अशी पाटी पाहिली आणि नमस्कार करुन मनात म्हणलं, इथे राम दिसतोय.
दुसर्या मजल्यावर गेलो,
चंदन जरा जोरातच म्हणाला,
"
सर येऊ का?"
साधारण उंचीची,थोडी जाडसर,पाठमोरी बसलेली व्यक्ती म्हणाली,
"
हो, या ना."
आम्ही आत बसलो. चंदन ने माझी ओळख करुन दिली. मला निरिक्षण करायची सवय आहे. व्यक्तीची देहबोली,एखाद्या परिस्थीतीमधले तिचे वागणे हे सगळं पहायची मला फार आवड आहे. इथेही माझा तोच उद्योग सुरु झाला. फिकट निळ्या रंगाचा टी शर्ट,जीन पॅंट,गळ्यात सोन्याची चेन, कानाला एक मशीन, टाळू भरल्यामुळे डोक्याची ओबडधोबड ठेवण,अंधत्वामूळे बंद असलेले डोळे हे सगळं मला दिसलं.हातात बासरी होती आणि दुसर्या हातानी मात्रा मोजल्यासारखे हातवारे सुरु होते.
मला वाटत होतं मला सगळं दिसलय पण माझा तो गैरसमज होता.
चंदन ते सांगतील ते वाजवायचा प्रयत्न करत होता.मला स्वरांची ओढ होती पण मला कधी शिकण्याचा योग आला नव्हता.
मग सरांनी त्याला थांबवलं आणि स्वतः वाजवायला लागले. मी काही वेळ पहाताच राहिलो.स्थळ काळाचं भान विसरलो.
आत्तापर्यंत मी असं संगीत कधी अनुभवलं नव्हंतं.स्वरांमधे मी बुडालो होतो. ते डोळे बंद असताना वाजवत होते,मी मुद्दाम ते बंद करुन ऍकत होतो.
मग ते काही वेळानी अती द्रुत लयीमधला हंसध्वनी वाजवून थांबले.
मला काय बोलावं सुचत नव्हतं,इच्छाही होत नव्हती.तसच बसून फक्त ऍकत रहावं असं वाटत होतं.
मग त्यांनी मला एक बासरी दिली आणि म्हणले,"वाजवा."
"
मी कधीच वाजवली नाहिये कशी वाजवणार.?"
मग त्यांनी मध्यम कसा वाजवायचा ते सांगितलं आणि माझ्या संगीत शिक्षणाचा श्रीगणेशा झाला.
मी पहिल्यांदा जे निरिक्षण केलेलें ते सगळं विसरुन एकच गोष्ट लख्ख पणे दिसली.
'
सूर'. ह्या माणसाचं वर्णन फक्त याच एका शब्दात होऊ शकतं याची जाणीव झाली.
मग नियमीत त्यांच्याकडे जायला लागलो, शिक्षण सुरु झालं.
रागाची मांडणी करण्याची त्यांची पद्धत, ताना,लयकारी, गायकी अंगानी श्रोत्याला एका अनोख्या विश्वात नेण्याची हातोटी या गोष्टी पोटभरुन अनुभवायला मिळाल्या.
मग एक दिवस त्यांच्या आईंकडून त्यांच्या भयंकर पण तितक्याच तेजस्वी बालपणाची माहिती मिळाली. लहानपणी टाळू भरल्यामुळे जीवावर बेतलेली शारिरीक आजारपणं, ऑपरेशन नी खंगलेलं बालपण,
भयंकर जिद्द, अथक परिश्रम या सगळ्या गोष्टी समजल्या.माझ्या मनात त्या माणसाविषयी फार प्रेम निर्माण झालं.
त्यांनी एकदा त्यांच्या गुरुंविषयी सांगितलं. "नागराज सर सुरांच्या बाबतीत फार पक्के आहेत, त्यांच्या समोर जर वाजवायचं असेल तर सुरांचा फार रियाझ करावा लागेल."
मी म्हणलं,"मला तुमच्याच कडे शिकायचयं."
पुढे एक दिवस चंदनचा फोन आला.
"
अरे,..."
मी म्हणल,"काय झालं रे?"
त्याला बोलवत नव्हतं,कसाबसा शब्दांचा ऍवज जमा करुन तो म्हणाला,
"
अरे बहुतेक सर गेले."
मला काहिच समजलं नाही,दोन मिनिट अक्षरशः दातखीळ बसली होती,दरदरुन घाम आला होता.
मी काहीच बोललो नाही,फोन ठेवला आणि लगेच त्यांच्या घरी गेलो.
चंदन ने सांगितलेला निरोप दुर्दैवाने खरा होता.त्यांचे वडिल सरांना एका दुसर्या क्लासला घेऊन जात होते आणि तेंव्हा एक छोटा अपघात झाला आणि तीव्र हृदयविकाराचा झटका आल्यामूळे त्यांना मृत्यु आला होता.
मला सरांच्या आईकडे पहाण्याची हिम्मत होत नव्हती.मी तिथे थोडावेळ बसलो आणि मला तेही अशक्य झालं.
नियती जे वाढते ते फक्त स्वीकारण्या शिवाय पर्याय नसतो.ते गेले,त्यांच व्यक्ती म्हणून अस्तित्व संपलं.स्वर जिवंत आहेत.बासरी वाजवताना ते जागृत होतात आणि ती पाठमोरी प्रतिमा डोळ्यासमोर आल्याशिवाय रहात नाही.
ते नसले तरी गुरुपॉर्णिमा हा दिवस आता रोजच साजरा केला जातो.स्वरांच नात अधिक घट्ट होतं.
फक्त माझे सुर त्यांच्या पायाची शोडशोपचार पूजा करुन त्यांच्या आठवणीत विसावतात
.